नीट नेटके नेटजन
सध्या प्रत्येक जण नुसते 'कोरोना', 'लोकडाऊन ', 'आर्थिक मंदी' यांच्याच चर्चेमध्ये गुंतलेला आहे. ज्याला बघावं तो फक्त निराशेच्याच सूरात बोलत असतो. जणु काही ४ महिने घरात बसणं म्हणजे शिक्षाच !! काही लोकांसाठी जरी हे अंशतः खरे असले तरी बहुतांशी लोक व्यवस्थितपणे आपले नित्यव्यवहार करू शकत आहे. चला, आज आपण जमेची बाजू बघू या आणि काहीतरी सकारात्मक बोलू या. जेव्हा जेव्हा जगावर मोठे संकट आले आहे तेव्हा तेव्हा जगात नवीन काहीतरी प्रचंड प्रगती झाली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस असंच काही घडलं की ज्याने औद्योगिक क्रांतीला जोरदार चालना दिली. मानवजातीवर आतापर्यंत अनेक वैश्विक संकटं आलेली आहेत अन प्रत्येक वेळेस माणूस नव्या जोमाने उभा राहिला नवीन काहीतरी धडा घेऊन, शिकून आणि प्रगती करून!
तर मंडळी, ह्या कोरोनाव्हायरसच्या परीक्षेच्या काळातही सध्या जगात एक मोठी क्रांती येत आहे आणि ती आहे 'डिजिटल क्रांती" किंवा सोप्या भाषेत "नेट क्रांती" !!
आमच्या शेजारच्या आजींना नवनवीन शिकायची खूप हौस !! अगदी व्हाट्सअँप काय, फेसबुक काय किंवा व्हिडीओ गेम खेळणे काय, त्यांना सगळंच आवडतं !! अमेरिकेत असलेल्या मुलगा, सून, नातवाशी सतत संपर्कात !! पण तरी ह्या नेटच्या जगात निरागस !! स्वतःसारखेच सगळ्यांना प्रामाणिक समजणाऱ्या आणि लगेच कुणाच्याही मदतीला धावून येणाऱ्या !! त्यांना एकदा कॉपी, पेस्ट आणि फॉरवर्ड शिकवले अन झाले !! व्हॉट्सअँपवर येणारे निम्मे मेसेज जे खरे नसतात त्यांना सगळ्यांना पाठवायचा सपाटा सुरु. तीन डोळेवालं जर्मन बाळ काय अन फॉरवर्ड केल्याने कुणा गरिबाला पैसे मिळतात काय, त्यांना सर्वच खरं वाटे. त्यांचा हेतू जरी प्रामाणिक असला तरी त्या असे मेसेज पुढे पाठवून इतरांना ते मेसेज पुढे पाठवायला उपलब्ध करून देत होत्या आणि उद्युक्त करत होत्या त्यामुळे ती साखळी काही तुटत नव्हती. त्यांच्या सुनेने नवीन दागिने केले आणि हौसेने सासूबाईंना फोटो म्हणून पाठवले तर आजींनी ते फोटो सगळ्यांशी शेअर केले. त्यांनी कौतुकाने केलं पण त्याअनुषंगाने सायबरगुन्हा होण्याच्या शक्यतेचा अजिबात न विचार करता. हे होतं जेव्हा आपण ह्या नेटच्या जगातील धोक्यांबद्दल अनभिज्ञ असतो. मंडळी, ह्या नेट च्या जगात सगळीच माणसे चांगली नसतात बरं!
माझ्या एका दूरच्या नातलगाच्या फेसबुक पोस्टने मला खूप विचलित केले. २५/२६ वर्षांचा तरुण इंजिनियर आत्महत्येबद्दल बोलत होता आणि त्या पोस्टवर लोक लाईक करीत होते; गंमत करत होते. त्याचा फेसबुक प्रोफाईल व्यवस्थित अभ्यासल्यावर लक्षात आले कि तो आपल्या कंपनीबद्दल खऱ्या-खोट्या वाईट गोष्टी लिहीत होता. त्याची नुकतीच नोकरी गेली होती आणि दुसरी नोकरी मिळत नव्हती त्यामुळे तो खूप निराश झाला होता. लगेच त्याच्याशी दूरध्वनीवर संपर्क केला आणि त्याला ताबडतोब सगळ्या पोस्ट डिलीट करायला सांगितलं. नव्याने जेव्हा त्याने नोकरी शोधायला सुरुवात केली तर त्याला लगेच मुलाखतीचे आमंत्रण आले; त्याची निवड झाली आणि त्याला चांगली नोकरी मिळाली. नेटवर आपण आपल्याही नकळत आपली एक डिजिटल ओळख किंवा व्यक्तिमत्व घडवत असतो. हल्ली कंपनी एखाद्या उमेदवाराबद्दल चौकशीसाठी त्याचे डिजिटल व्यक्तिमत्व प्रथम बघते मगच पुढच्या स्टेप्स घेते. आणि आपल्याला वाटतं की जे काही आपण नेटवर टाकतो त्याला कोण बघतंय. मंडळी, सावध रहा. एक चुकीची पोस्ट तुम्हाला एका चांगल्या नोकरीच्या संधीपासून वंचित करू शकते.
माझ्या एका मैत्रिणीचं सोशल मीडियाशी घनिष्ठ नातं !! उठसुठ मुलांचे फोटो काढून फेसबुक वर टाकणे हा तिचा छंद !! अगदी आज 'जेवणात कोणती भाजी" पासून ते मुलांचं अभ्यासावरून झालेलं भांडण आणि रडणं देखील शेअर !! रेस्टाॅरन्टमध्ये जेवण कमी आणि सेल्फीचं जास्त. परवा तिच्या घरी तिचा इंजिनीरिंगला असलेला धाकटा भाऊ आला आणि हा सगळा प्रकार बघून त्याने ताईला भले मोठे भाषण दिले. मंडळी, आपण ज्यांना नेटवर जे फ्रेंड बनवतो त्याबद्दल चौकस आणि सतर्क असावं. त्यातले काही आपल्या नकळत आपले स्टॉकर (वाईट उद्देशाने मागे लागणारे) होऊ शकतात आणि आपल्याला खूप त्रास देऊ शकतात.
माझ्या एका विद्यार्थ्याला एक ई-मेल आले. त्याचा एक मित्र परदेशी एकटाच अडकला होता आणि त्याला पैशाची नितांत गरज होती. ई-मेल मध्ये त्याने बँकेच्या खात्याची माहिती दिली होती आणि त्वरित पैसे पाठवण्याची विनंती केली होती. पण माझ्या विद्यार्थ्याने थोडा विचार केला आणि तातडीने मित्राला फोन लावला. मित्र व्यवस्थित होता आणि त्याचा पासवर्ड हॅक झाला होता. तसाच ई-मेल इतर अनेक मित्रांना देखील मिळाल्याचे कळते. असे अनेक फसवणूक करणारे मेसेजेस आपल्या बघण्यात रोज येतात. मग काय करावं, नेट सोडून द्यावं ? नाही मंडळी, नेट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालं आहे. त्यातले चांगले नक्कीच घ्यावे पण वाईटाबद्दलही सतर्क आणि सावध असावे.
तर चला मंडळी, आपण डिजिटल आयडेंटिटी, सायबर सिक्युरिटी आणि सायबर क्राईम बद्दल थोडे अधिक जाणून घेऊ या. भीती पोटी नाही तर ह्या पुढे सर्वच काही डिजिटल होणार आहे आणि आपल्याला ते शिकणे गरजेचे आहे म्हणून.
डिजिटल आयडेंटिटी म्हणजे आपली नेटवरचे व्यक्तिमत्व. विद्यापीठात प्रवेश देणारा अधिकारी असो किंवा अगदी लग्नासाठी आलेलं स्थळ असो, त्या व्यक्तीचं नाव शोधलं की आपल्याला त्या व्यक्तीने सार्वजनिकरित्या उपलब्ध केलेली सगळी माहिती सहज मिळते. पण खूप पाळत ठेऊ नका बरं तुमची स्टाॅकर श्रेणीत गणना होईल!! पण आपण स्वतः च वारंवार तत्सम माहिती आपल्याबद्दलपण शोधत रहावे म्हणजे आपली काय डिजिटल आयडेंटिटी आहे त्याची आपल्याला कल्पना येईल. शक्यतो नेट वर नकारात्मक पोस्ट टाकणे टाळावे. कोणतीही माहिती पुढे फॉरवर्ड करण्याआधी त्याच्या सत्यतेबद्दलबद्दल खात्री करून घ्यावी. बरीच संकेत स्थळे अशा बनावटी / खोट्या बातम्यांच्या विश्लेषणासाठी बनलेल्या आहेत.निवडणुकीच्या काळात अशा बातम्यांना पूर येतो. तसेंच काही प्रतिथयश व्यक्ती आजारी असताना त्यांच्या निधनाची अफवा लोकं पसरवतात किंवा मोठ-मोठ्या कंपन्यांना बदनाम करण्यासाठी इतर स्पर्धक कंपन्या असं करतात. कारण काही असो, बातमी पुढे पाठवण्या आधी खातरजमा नक्की करून घ्यावी. मी फक्त फॉरवर्ड केले असे म्हणून आपण आपली जवाबदारी झटकू शकत नाही.
सायबर सिक्युरिटी म्हणजे जी खाजगी आणि संरक्षित माहिती आहे तिचे संरक्षण. माहिती व्यक्तीची असो वा कंपनीची. अनधिकृत व्यक्ती जेव्हा अशी खाजगी किंवा संरक्षित माहिती मिळवू शकते तेव्हा त्याला सिक्युरिटी ब्रीच म्हणतात. डिजिटल क्रांती मुळे आपण अधिकाधिक माहिती नेटवर शेअर करत आहोत. शिवाय इंटरनेट ऑफ थिग्ज, ई-बँकिंग, ई-शॉपिंग, ई-कॉमर्स ह्याचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नेटवर होणारी माहितीची देवाणघेवाण पण प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि त्यामुळे सिक्युरिटीची जास्त गरज भासते आहे.
सायबर क्राईम म्हणजे नेट वर होणार गुन्हा. हा विषय इतका विस्तृत आहे की ह्या वर एक ग्रंथ लिहिता येईल. खाजगी माहिती वर अनेक प्रकारे हल्ला करता येतो. ई-मेल द्वारे आलेल्या एखाद्या दुव्यावर क्लिक केल्यास तुमची खाजगी माहिती हॅकरला उपलब्ध होते ह्याला मालवेअर हल्ला म्हणतात. बऱ्याच वेळा तुम्ही एखाद्या सरकारी साईटला लॉग-इन करू बघता पण तुम्हाला सर्वर उपलब्ध नसल्याचे मेसेज येतात आणि त्याचवेळी दुसरीकडे सर्वर व्यवस्थित चालू असतो. ह्याला डी ओ एस (डिनायल ऑफ सर्विस) हल्ला असे म्हणतात. स्पुफिन्ग म्हणजे वापरकर्त्याला मूर्ख बनवून तो खऱ्या संकेत सठसलवार आलाय असे भासवणे. पासवर्ड हल्ला म्हणजे येन -केन-प्रकारेण तुमचा पासवर्ड चोरी करणे.
ह्यासाठी सावधगिरी म्हणजे http असलेल्या संकेत स्थळांचा उपयोग न करता https (सिक्युअर्ड) संकेत स्थळांवर जाणे. संकेत स्थळाचा डोमेन नीट तपासणे. आपले पासवर्ड साधे, सोपे न ठेवणे व कुणाबरोबर शेअर न करणे. सदैव Two-Factor -Authentication (दोन घटक प्रमाणीकरण) चा वापर करणे जेणेकरून कुणी तुमचा पासवर्ड जरी मिळविला तरी त्याचा ओ टी पि मोबाईलवर येईल आणि ती अनधिकृत व्यक्ती लॉगिन करू शकणार नाही. शक्यतो पब्लिक वाय-फायचा वापर टाळावा किंवा त्यावर नेट बँकिंग, नेट शॉपिंग इत्यादी टाळावे. तुमच्या यंत्रांना/अँप्सना मर्यादित ऍक्सेस असावा.
मंडळी, इंटरनेट खूप उपयोगी आहे. त्याचा उपयोग नक्की करावा पण त्याचबरोबर सजग, सावध आणि सतर्क असावे.
नीट नेटके नेटीजन व्हावे.
प्रीती कोळेकर
Good information about safety and security on net. People, mainly not familiar with these issues but use SMART phones and social media should be aware about it. Good awareness.
ReplyDeleteThank you!!
DeleteGood one Preeti
ReplyDeleteThank you, but I am not able to see who this is.
DeleteVery useful information shared by you and it's a need of an hour...
ReplyDeleteThank you.May I know who this is?
DeleteNice information. Keep it coming.
ReplyDeleteThanks for encouragement, Sanjay
ReplyDelete